साईनाथ सगुणोपासना आरती

श्री साईलीलेच्या प्रथम अंकावरून संपादित श्री साईसगुणोपासनेची जन्मकथा वेदशास्त्रसंपन्न कृष्णशास्त्री जागेश्वर भीष्म नागपूर जिल्ह्यातील बोरी या गावी वास्तव्य करीत असत व शेतीवाडी करून आपला निर्वाह चालवीत. त्यांच्या पत्नी निवर्तल्यावर त्यांचे चित्त अस्थिर झाले. त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला; पण त्यांना तो रूचला नाही. शके १८३०, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस रात्रौ त्यांना एक स्वप्न पडले : एक काळ्या वर्णाचा पुरूष त्यांना दिसला. त्याच्या अंगास केशरी रंगाची उटी लागली होती, कपाळास त्रिपुंड्र होते व पादुकांचीही गंधपुष्पाने पूजा झाली होती. त्याने भीष्मांच्या हाती एक वर्तमानपत्र दिले. भीष्मांनी त्याला विचारले, तू कोण व तुझे नाव काय ? तेव्हा त्याने संभाषण न करता त्या वर्तमानपत्राकडे बोट दाखविले. भीष्मांनी वर्तमानपत्राकडे नजर टाकताच त्यांना 'सच्चिदानंद' ही ठळक अक्षरे दिसली. तितक्यात त्या पुरूषाने “वाचा”, अशी भीष्मांना आज्ञा केली. तेव्हा पुनः त्या वर्तमानपत्राकडे पाहू लागता “मंत्र व शिकावा”, असे एके जागी लिहिले होते. हे काय, याचा अर्थ वगैरे प्रश्न करण्याचा भीष्म विचार करतात तो, तो पुरूष नाही व वर्तमानपत्रही नाही. ते विस्मित झाले. इतक्यात त्यांच्या मित्राने दार ठोठावले व त्याबरोबर त्यांना जाग आली. ताबडतोब हे स्वप्न त्यांनी आपल्या रोजनिशित लिहून ठेवले. पण या स्वप्नाचे कोडे काहीकेल्या त्यांना उमजेना. काही दिवसांनी तेथे एक गाणपत्य साधु आले. त्यांना हे स्वप्न सांगितल्यावर “सच्चिदानंद स्वामी तुमचे गुरू आहेत", असे म्हणून त्यांना “वशिकावा” हा मंत्र दिला.


काही दिवसांनी भीष्म उमरावतीस गेले असता दादासाहेब खापड्र्यांनी “शिरडीस चलता काय ?” असा त्यांना प्रश्न केला. भीष्मांनी रूकार दिला व खापड्र्यांच्यासमवेत ते शिरडीस गेले. शिरडीस पोचताच भीष्मांनी साईबाबांचे दर्शन घेतले व त्यांना नमस्कार केला. बाबांनी हात जोडले व "जय सच्चिदानंद”, असे तोंडाने म्हणाले तेव्हा भीष्म घोटाळ्यात पडले. स्वप्नात दिसलेले सच्चिदानंद व हे - एक की दोन ? एक म्हणावे, तर स्वप्नातील साधु वैष्णव होते व साईबाबा तर यवन दिसतात. दोन म्हणावे, तर बाबांनी आपल्याला पाहिल्याबरोबर सच्चिदानंदाचे नाव का घेतले? अशा विचारात ते पडले. तेथे सर्व हिंदु, ब्राह्मणसुद्धा बाबांचे चरणोदक घेत असत; पण भीष्मांनी ते घेतले नाही. बाबा तंबाखूची चिलीम पीत असत. भीष्म बाबांच्या जवळ बसले ● असले तरी बाबांनी त्यांना सुरूवातीस चिलीम ओढण्यास दिली नाही. पण एक दिवस बाबांच्या गोष्टी चालल्या असता एका सेवकाने चिलीम भरली व बाबांच्या हाती दिली. बाबांनी ती नुसती तोंडास लावली व जवळ बसलेल्या भीष्मांना देऊन “पी”, असे म्हणाले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे भीष्म चिलीम प्याले व बाबांच्या हाती परत दिली. बाबांनी ती घेतली व तोंडाने "आपण सगळीकडे फिरतो, गड्या. मुंबई, पुणे, सातारा, नागपूर ही सगळी शहरे रामाने भरली आहेत", असे बोलून ते भीष्मांना एकदम म्हणाले, “तू लाडू एकटा एकटाच खातोस, आम्हास एकही देत नाहीस. आतातरी तू मला पाच लाडू दे !” बाबा प्रत्येक भक्ताकडे दक्षिणा मागत व त्याचा विनियोग ते परोपकारासाठी करीत, हे सर्व साईभक्तांस विदीत आहेच. बाबांच्या या वाक्यांनी भीष्मांच्या मनावर निराळाच परिणाम झाला.


स्वप्नात दिसलेले सच्चिदानंद वेगळे व साईनाथ वेगळे ही भावना तात्काळ मावळली (तीर्थ वाटणाऱ्याकडून त्यांनी बुध्या तीर्थ मागून घेतले) व बाबांच्या पायावर डोके ठेवले. त्यावेळेस बाबांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर दोन मिनिटे ठेविला. तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती देवनाथांच्या खालील पदांत वर्णिल्याप्रमाणे “मेरा मैं जानूं" अशी झाली.


गुरूकृपे का अंजन पाया मेरा मैं जानूं ।
आपरूप नयनों में छाया मेरा मैं जानूं ।।धृ।।

उलट मार्ग की राह बतायी मेरा मैं जानूं ।
बुरे करम की रेख मिटाई मेरा मैं जानूं । । १ । ।

चांदसुरज बिन परा उजाला मेरा मैं जानूं ।
पिलाया अजरामर का प्याला मेरा मैं जानूं । । २ ।।

जहां तहां मैं आप अकेला मेरा मैं जानूं ।
आप ही गुरू और आप ही चेला मेरा मैं जानूं ।। ३ ।।

गोविंदनाथ ने यही बतलाया मेरा मैं जानूं ।
देवनाथ अपने मे मिलाया मेरा मैं जानूं ॥४ ॥


नंतर भीष्म बिऱ्हाडी गेले. पण या परस्थळी आपण लाडू कसे करणार याची त्यांना चिंता लागली. केले तरी दुसऱ्याच्या मदतीने आणि बाबा ते ओळखणारच. शिवाय पाचच लाडू का मागितले? नुसते लाडूच का मागितले नाही ? असा मनाशी विचार करित त्यांनी दिवस घालविला. रात्री त्याच चिंतनात त्यांना झोप लागली. पण लवकरच ती उघडली व एक श्लोक करण्याची त्यांना स्फूर्ति झाली. लागलीच श्लोक तयार झाला. सकाळी त्याच्या पुढचा श्लोक करीत बसले असता काकासाहेब दीक्षितांनी बाबांकडे जाताना वाटेत तो श्लोक पाहिला. काही वेळाने स्नान करून भीष्मही बाबांच्या दर्शनास गेले. गेल्याबरोबर बाबांनी भीष्मांना लाडवांची आठवण करून दिली. भीष्म काही बोलले नाहीत, तरी दीक्षित म्हणाले, “लाडू तयार होऊन राहिले आहेत." हे ऐकताच महाराज स्वस्थ बसले. दुसऱ्या दिवशी भीष्मांनी पाच श्लोक तयार केले व नंतर डोके बरेच चालविले; परंतु पाचांपेक्षा अधिक श्लोक त्यांना स्फुरले नाहीत. बाबांच्या हातात पाच श्लोकांचा कागद दिल्यावर त्यांनी तो पाहून भीष्मांस वाचावयास आज्ञा केली. ते श्लोक वाचीत असता पुनः बाबांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळेस त्यांच्या मनाची जी स्थिती झाली ती अवर्णनीय होती. त्यानंतर प्रत्येक कविता तयार करावी व बाबांना दाखवावी आणि त्यांच्या आज्ञेने वाचून दाखवावी, असा क्रम सुरू झाला. व 'श्री साईनाथ सगुणोपासना' नावाची पुस्तिका तयार होऊन 'श्रीसाईचरणी' अर्पण केली


श्री साईनाथ - सगुणोपासनेची पुस्तके १९२२ पर्यंत नामदार गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डेस्वखर्चाने छापवीत असत. 'श्री साईबाबा संस्थान, शिरडी या धर्मादाय संस्थेची स्थापना झाल्यानंतर संस्थानच्या कार्यकारी मंडळाने भीष्मांच्या संमतीने पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करायचे ठरविले व मूळ पुस्तिकेत काही अधिक पदांची भर घालून नवी आवृत्ती प्रकाशित केली. अशी आहे श्री साईनाथ सगुणोपासनेच्या जन्माची सुरस कथा.


- प्रकाशक


कांकड आरती

प्रातःकाळचा उपासनाक्रम (पहाटे ४.३० वाजता)

(१) भूपाळी

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सद्गुरूनाथा । । १ । ।
असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सद्गुरूराया ॥२॥
अखंडित असावें ऐसे वाटतें पायीं ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई 113 11
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोडी ॥४॥


(२) भूपाळी

उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरूडपारीं दाटला । । १ । ।
गरूडपारापासुनी महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची मांदी उभी जोडूनिया हात ॥२॥



शुकसंकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पति ॥३॥

कलियुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
पाठीमागे उभा डोळा लावुनीया जनी ॥४॥

(३) भूपाळी

(चाल – धन्य श्यामसुंदरा श्रीधरा)

उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावां ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥धृ॥

गेली तुम्हां सोडूनियां भवतमरजनी विलया ।
परी ही अज्ञानासी तुमची भूलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया ।
तुम्हीच तीते सारुनि दावां मुख जन ताराया ॥च०॥

भो साईनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी ।
अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवि ॥च०॥

सकृप होऊनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ।
आधिव्याधि उठा उठा ॥१॥

भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हां अनुसरले ।
ध्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन आमुचे धाले ।
परी त्वद्वचनामृत प्राशायाते आतुर झाले ॥च०॥

उघडूनी नेत्रकमळा दीनबंधु रमाकांता ।
पाही बा कृपादृष्टी बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरि ताप साईनाथ ॥च०॥

आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितो देवा ।
सहन करिशी ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा ॥
उठा उठा ॥ आधिव्याधि ॥२॥

(४) भूपाळी

उठा पांडुरंगा आता दर्शन घ्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ ॥१॥

संत साधुमुनी अवघे झालेती गोळा ।
सोहळा रचे सुखे आता बघुं या मुखकमळ ॥२॥

रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी ।
मन उताविळ रूप पहावया दृष्टी ॥३॥

राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।
येणे हालवूनी जागे करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट ॥५॥

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनी कांकडा ॥६॥

(५) अभंग

घेऊनिया पंचारती करू बाबांसी आरती ।
करू साईसी ॥धृ॥

उठा उठा हो बांधव । ओवाळू हा रमाधव ।
साईरं ॥१॥

करुनिया स्थिर मन । पाहू गंभीर हे ध्यान ।
साईचे हे ॥२॥

कृष्णनाथ दत्तसाई । जडो चित्त तुझे पायी ।
साई तु ॥३॥

(६) कांकड आरती

कांकड आरती करितां साईनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवां घेऊनि बालक-लघुमेव ॥धृ॥

काम क्रोध मद मत्सर आतुनी कांकडा केला ।
वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला ।
साईनाथ गुरु भक्तिज्वलने तो मी पेटविला ।
तद्वृत्ती जाळुनी गुरूंनी प्रकाश पाडिला ।
द्वैत-तम नासुनी मिळवी तत्वरूपी जीवां ॥१॥

भू-खेचर व्यापुनी अवघे हृद्कमळी राहसी ।
तोजि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहुनी येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धावसी ।
निरसुनिया संकटां दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवां ॥२॥

प्रार्थनी त्वद्वचनामृत आमुचे देहभान हरपले ।
सोडूनिया दुर्भिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनिया साईमाऊले दास पदरी घ्यावा ॥३॥

(७) कांकड आरती

भक्तीच्या पोटी बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओवाळू आरती ॥१॥

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥धृ॥

काय महिमा वर्णू आता सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्ये मुख पाहता जाती ॥२॥

राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाही ।
मयूरपिच्छ चामरे ढाळित ठायीं ठायी ॥३॥

तुका म्हणे दीप घेऊनि उन्नतित शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥

(८) पद (उठा उठा)

उठा साधुसंत साधा आपुलाले हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत ॥१॥

उठोनिया पहाटे बाबा उभा असे विटे ।
चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ॥२॥

उठा उठा हो वेगेसी चला जाऊंया राऊळासी ।
जळतील पातकांच्या राशी कांकड आरती देखिलिया ॥३॥

जागे करा रुक्मिणीवर देव आहे निजसुरांत ।
वेगें लवलोण करा दृष्ट होईल तयासी ॥४॥

दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती ।
होते कांकड आरती माझ्या सद्गुरुरायांची ॥५॥

सिंहनाद शंखभेरी आनंद होतसे महाद्वारी ।
केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥६॥

भजन

साईनाथगुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥
दत्तराज गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥

श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ।

(९) श्री साईनाथ प्रभाताष्टक (पृथ्वी)

प्रभातसमयी नभा शुभ रविप्रभा फाकली ।
स्मरे गुरु सदा असा समयी त्यां छळे न कली ॥
म्हणोनि कर जोडुनी करूं आता गुरुप्रार्थना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥१॥

तम निरसि भानु हा गुरूहि नासि अज्ञानता ।
परंतु गुरूची करी न रविही कधीं साम्यता ।
पुनः तिमिर जन्म घे गुरूकृपेनि अज्ञान ना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥२॥

रवि प्रकट होउनि त्वरीत घालवी आलसा ।
तसा गुरूहि सोडवी सकल दुष्कृतिलालसा ।
हरोनि अभिमानही जडवी तत्वदी भावना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥३॥

गुरूसी उपमा दिसे विधिहरिहरांची उणी ।
कुठेनि मग येई ती कवनीं या उणी पाहुनी ।
तुझीच उपमा तुला बरीव शोभते सज्जना ।

समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥४॥

समाधि उतरूनिया गुरु चला मशिदीकडे ।
त्वदीय वचनोक्ती ती मधुर वारिती सांकडे ।
अजातरिपु सद्गुरु अखिल पातका भंजना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥५॥

अहा सुसमयासी या गुरु उठोनिया बैसले ।
विलोकिनी पदाश्रिता तदिय आपदे नासिले ।
असा सुहितकारी या जगती कोणीही अन्य ना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥६॥

असे बहुत शहाणा परी न ज्या गुरुची कृपा ।
न तत्स्वहित त्याचे कळे करितसे रिकाम्या गपा ।
जरी गुरुपदा धरी सुदृढ भक्तिने तो मना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥७॥

गुरो विनंति मी करी हृदयमंदिरी या बसा ।
समस्त जग हे गुरुस्वरुपाची ठसो मानसा ।
घडो सतत सत्कृती मति ही दे जगत्पावना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवांछना ॥८॥

(१०) पद

साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ॥धृ॥

जाना तुमने जगतसारा, सबही झूठ जमाना ॥१॥
साई ॥१॥

मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको चरण दिखलाना ॥२॥
साई ॥२॥

दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ॥३॥
साई ॥३॥

(११) पद

रहम नजर करो, अब मोरे साई,
तुम बिन नहीं मुझे मां-बाप भाई ॥धृ॥

मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा ।
मैं ना जानूं अल्लाह इलाही ॥१॥

खाली जमाना मैंने गवाया ।
साथी आखिरी तू और न कोई ॥२॥

अपने मशीद का झाड़ू गनू है ।
मालिक हमारे, तुम बाबा साई ॥३॥

(१२) पद

तुज काय देऊं सावळ्या मी खावा तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।

उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी ।
तुं जगनाथ, तुज देऊं कशी रे भाकरी ।

नको अंत मदीय पाहू सकळा भगवंता श्रीकांता ।
मध्याह्नरात्र उलटोनि गेली ही आतां आण चिंता ।

जा होईल तुजा रे कांकडा की राऊळांतरी ।
आणतील भक्त नैवेद्यहि नानापरी ॥

(१३) पद

श्रीसद्गुरु बाबासाई तुजवांचुनी आश्रय नाही ।
भूतळी ॥धृ॥

मी पापी पतित धीमंदा ।
तारणे मला गुरुनाथा, झडकारी ॥१॥

तूं शांतिक्षेमाचा मेरू ।
तूं भवर्णवींचे तारू, गुरुवरा ॥२॥

गुरुवरा मजसी पामरा, आता उद्धरा, त्वरीत लवलाही ।
मी बुडतो भवभय डोहीं उद्धरा ॥३॥

ॐ राजाधिराज योगिराज परब्रह्म
“श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज”
– कांकड आरतीचा कार्यक्रम समाप्त –

मध्याह्न आरती

दुपारी १२ वाजता

(१) अभंग

घेऊनिया पंचारती करू बाबांसी आरती ।
करू साईसी ॥१॥

उठा उठा हो बांधव । ओवाळू हा रमाधव ॥
साईरं ॥२॥

करुनिया स्थिर मन । पाहू गंभीर हे ध्यान ॥
साईचे हे ॥३॥

कृष्णनाथ दत्तसाई । जडो चित्त तुझे पायी ॥
साईतु ॥४॥

(२-अ) आरती

आरती साईबाबा । सौख्यदाता जीवां ।
चरणराजतळीं द्यावा दासां विसावा ।
भक्तां विसावा ॥धृ॥

जाळुनिया अनंग । स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजनां दावी निजडोळा श्रीरंग ॥१॥

जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥२॥

तुमचे नाम ध्याता । हरे संसृति व्यथा ।
अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा ॥३॥

कलियुगी अवतार । सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर ॥४॥

आठां दिवसां गुरुवारी भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया भवभय निवारी ॥५॥

माझा निजद्रव्यठेवा तव चरणरजसेवा ।
मागणे हेचि आता तुम्हां देवाधिदेवा ॥६॥

इच्छित दीन चातक निर्मळ तोय निजसुख ।
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक ॥७॥

(२-ब) आरती

जय देव जय देव दत्ता अवधूता । साई अवधूता ।
जोडूनी कर तव चरणीं ठेवितो माथा ॥धृ॥

अवतारसी तू येता धर्माते ग्लानी ।
नास्तिकांनाही तू लाविसी निजभजनी ॥१॥

दाविसी नाना लीला असंख्य रुपांनी ।
हरिसी दीनांचे तू संकट दिनरजनी ॥२॥

यवनस्वरुपी एकया दर्शन त्वां दिलें ।
संसय निरसुनियां तत्त्वता चालविलें ।
गोपिचंदा मन्दा त्वां उध्दरिलें ।
मोमिन वंशी जन्मुनि लोकां तारिलें ॥३॥

भेद न तत्त्वीं हिंदू यवनांचा काही ।
दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
वाहिसी प्रेमानें तू हिंदू-यवनांही ।
दाविसी आत्मत्वाने व्यापक हा साई ॥४॥

देवा साईनाथ त्वत्पदनत भावे ।
परमायामोहित जन्मोचन झणी व्हावे ।
त्वत्कृपे सकलांचे संकट निरसावे ।
देशील तरी दे त्वद्या कृष्णाने गावें ॥४॥

(३) अभंग

शिरडी माझे पंढरपूर । साईबाबा रामावर ॥१॥
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ॥२॥

या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ॥३॥
गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई ॥४॥

(४) नमन

घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ॥
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वभावात् ।
करोमी यद्यत्सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥

(५) नामस्मरण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)

(६) पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्य
राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति ।
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो
मरुत्तस्यावसन्गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः
सभासद इति ॥

(५) नामस्मरण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)

(६) पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्य
राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति ।
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो
मरुत्तस्यावसन्गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः
सभासद इति ॥

(७) नमस्काराष्टक

अनंता तुला तें कसें रे स्तवावें ।
अनंता तुला तें कसें रे नमावें ॥
अनंत मुखांचा शिणे शेष गातां ।
नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ १ ॥

स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें ।
उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ॥
तरावें जगा तारूनी मायताता । नमस्कार० ॥ २ ॥

वसे जो सदा दावया संतलीला ।
दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ॥
परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार० ॥ ३ ॥

बरा लाधला जन्म हा मानवाचा ।
नरा सार्थका साधनीभूत साचा ॥
धरूं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार० ॥ ४ ॥

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला ।

करावें आम्हां धन्य चुंबोनि गाला ॥
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार० ॥ ५ ॥

सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती ।
शुकादिक ज्यांतें समानत्व देती ॥
प्रयागादि तीर्थेपदीं नम्र होतां । नमस्कार० ॥ ६ ॥

तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली ।
सदा रंगली चित्स्वरूपीं मिळाली ॥
करी रासक्रिडा सर्वे । कृष्णनाथा । नमस्कार ० ॥ ७ ॥

तुला मागतों मागणें एक द्यावें ।
करा जोडितों दीन अत्यंत भावें ॥
भवी मोहनीराज हा तारिं आतां । नमस्कार ० ॥ ८ ॥

(८) प्रार्थना

ऐसा येई बा । साई दिगंबरा । अक्षयरूप अवतारा ।
सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसयात्रिकुमारा ॥ ध्रु० ॥

काशी स्नान जप, प्रतिदिनशीं । कोल्हापुर भिक्षेसी ।
निर्मल नदितुंगा, जल प्राशी ।
निद्रा माहुर देशीं ॥ ऐं० ॥ १ ॥

झोळी लोंबतसे वाम करीं । त्रिशूल डमरू-धारी ।
भक्ता वरद सदा सुखकारी ।
देशील मुक्ती चारी ॥ ऐं० ॥ २ ॥

पायी पादुका । जपमाला कमंडलू मृगछाला ।
धारण करिशी बा । नागजटा मुगुट
शोभतो माथां ॥ ऐं० ॥ ३ ॥

तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे सदनीं ।
लक्ष्मी वास करी दिनरजनीं ।
रक्षिसि संकट वारूनि ॥ ऐं० ॥ ४ ॥

या परिध्यान तुझें गुरूराया । दृश्य करीं नयनां या ।
पूर्णानंदसुखें ही काया ।
लाविसि हरिगुण गाया ॥ ऐं० ॥ ५ ॥

(९) श्रीसाईनाथमहिम्नस्तोत्रम्

सदा सत्स्वरूपं चिदानंदकंदं, जगत्सम्भवस्थानसंहारहेतुम् ।
स्वभक्तेच्छयामानुषं दर्शयंतं,
नमामीश्वरं सद्गुरुसाईनाथम् ॥ १ ॥

भवध्वान्तविध्वंसमार्तण्डमीड्यं,
मनोवागतीतं मुनीध्यानगम्यम् ।
जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां, नमामी० ॥ २ ॥

भवाम्भोधिमग्नादितानां जनानां,
स्वपादाश्रितां स्वभक्तिप्रियाणाम् ।
समुद्धरणार्थ कलौ संभवंतं, नमामी० ॥ ३ ॥

सदा निंबवृक्षस्य
मूलाधिवासात्सुधास्त्राविणं तिक्तमप्यप्रियं तम् ।
तरूं कल्पवृक्षाधिकं साधयंतं, नमामी० ॥ ४ ॥

सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले
भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवाम् ।
नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं, नमामी० ॥ ५ ॥

अनेकाश्रुततर्क्यलीला विलासैः,
समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् ।
अहंभावहीनं प्रसन्नात्मभावं, नमामी ० ॥ ६ ॥

सतां विश्रमाराममेवाभिरामं सदा
सज्जनैः संस्तुतं सन्नमद्भिः ।
जनामोददं भक्तभद्रप्रदं तं, नमामी ० ॥ ७ ॥

अजन्माद्यमेकं परं ब्रह्म
साक्षात्स्वयंसंभवं-राममेवावतीर्णम् ।
भवद्दर्शनात्संपुनीतः प्रभोऽहं, नमामी ० ॥ ८ ॥

श्रीसाईशकृपानिधेऽखिलनृणां सर्वार्थसिद्धप्रद ।
युष्मत्पादरजः प्रभावमतुलं धातापि वक्ताऽक्षमः ।
सद्भक्त्या शरणं कृतांजलिपुतः संप्रापितोऽस्मि प्रभो,
श्रीमत्साईपरेशपादकमलान्नान्यच्छरण्यं मम ॥ ९ ॥

साईरूपधरराघवोत्तमं,
भक्तकामविबुधद्रुमं प्रभुम् ।
माययोपहतचित्तशुद्धये, चिंतयाम्यहमहर्निशं मुदा ॥ १० ॥

शरत्सुधांशुप्रतिमप्रकाश,
कृपातपात्रं तव साईनाथ । त्वदीयपादाब्जसमाश्रितानां
स्वच्छायया तापमपाकरोतु ॥ ११ ॥

उपासनादैवतसाईनाथ, स्तवैर्मयो पासनिना स्तुतस्त्वम् ।
रमेन्मनो मे तव पादयुग्मे,
भृङ्गो, यथाब्जे मकरन्दलुब्धः ॥ १२ ॥

अनेकजन्मार्जितपापसंक्षयो,
भवेद्भवत्पादरोजदर्शनात् । क्षमस्व सर्वानपराध-
पुंजकान्प्रसीद साईश गुरो दयानिधे ॥ १३ ॥

श्री साईनाथचरणांमृतपूतचित्तास्तत्पादसेवनरताः
सततं च भक्त्या । संसारजन्यदुरितौधविनिर्गतास्ते
कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति ॥ १४ ॥

स्तोत्रमेतत्पठेद्भक्त्या यो नरस्तन्मनाः सदा ।
सद्गुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम् ॥ १५ ॥

(१०) प्रार्थना

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ।
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्रीप्रभो साईनाथ ॥ १ ॥

श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय
ॐ राजाधिराज योगिराज परब्रह्म
"श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज"
- माध्यान्ह आरतीचा कार्यक्रम समाप्त -

धूप आरती
सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी

(१) आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।
चरणरजातलीं । द्यावा दासां विसांवा,
भक्तां विसावा ॥ आ० ॥ ध्रु० ॥

जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।
मुमुक्षुजनां दावी । निज डोळां श्रीरंग ॥ आ० ॥ १ ॥

जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माव ॥ आ० ॥ २ ॥

तुमचे नाम ध्याता । हरे संसृती व्यथा ।
अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा ॥ आ० ॥ ३ ॥

कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण जालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ द० ॥ आ० ॥ ४ ॥

आठां दिवसां गुरूवारीं । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ आ० ॥ ५ ॥

माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा
मागणे हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ॥ आ० ॥ ६ ॥

इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥ आ० ॥ ७ ॥

(२) अभंग

शिर्डी माझें पंढरपूर । साईबाबा रमावर ॥ १ ॥
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ॥ २ ॥
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ॥ ३ ॥
गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई ॥ ४ ॥

(३) नमन

घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यांनीं पाहीन रूप तुझें ॥
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा

बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वभावात् ।
करोमी यद्यत्सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥

अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥

(४) नामस्मरण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)

(५) नमस्काराष्टक

अनंता तुला तें कसें रे स्तवावें ।
अनंता तुला तें कसें रे नमावें ॥
अनंत मुखांचा शिणे शेष गातां ।
नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥ १ ॥

स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें ।
उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ॥
तरावें जगा तारूनी मायताता । नमस्कार० ॥ २ ॥

वसे जो सदा दावया संतलीला ।
दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ॥
परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार० ॥ ३ ॥

बरा लाधला जन्म हा मानवाचा ।
नरा सार्थका साधनीभूत साचा ॥
धरूं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार० ॥ ४ ॥

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला ।
करावें आम्हां धन्य चुंबोनि गाला ॥
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार० ॥ ५ ॥

सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती ।
शुकादिक ज्यांतें समानत्व देती ॥
प्रयागादि तीर्थेपदीं नम्र होतां । नमस्कार० ॥ ६ ॥

तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली ।
सदा रंगली चित्स्वरूपीं मिळाली ॥
करी रासक्रिडा सर्वे । कृष्णनाथा । नमस्कार ० ॥ ७ ॥

तुला मागतों मागणें एक द्यावें ।
करा जोडितों दीन अत्यंत भावें ॥
भवी मोहनीराज हा तारिं आतां । नमस्कार ० ॥ ८ ॥

(६) प्रार्थना

ऐंसा येई बा । साई दिगंबरा । अक्षयरूप अवतारा ।
सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसयाऽत्रिकुमारा ॥ ध्रु० ॥

काशी स्नान जप, प्रतिदिनशीं । कोल्हापुर भिक्षेसी ।
निर्मल नदितुंगा, जल प्राशी ।
निद्रा माहुर देशीं ॥ ऐ० ॥ १ ॥

झोळी लोंबतसे वाम करीं । त्रिशूल डमरू-धारी ।
भक्ता वरद सदा सुखकारी ।
देशील मुक्ती चारी ॥ ऐ० ॥ २ ॥

पायी पादुका । जपमाला कमंडलू मृगछाला ।
धारण करिशी बा । नागजटा मुगुट
शोभतो माथां ॥ ऐ० ॥ ३ ॥

तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे सदनीं ।
लक्ष्मी वास करी दिनरजनीं ।
रक्षिसि संकट वारूनि ॥ ऐ० ॥ ४ ॥

या परिध्यान तुझें गुरूराया । दृश्य करीं नयनां या ।
पूर्णानंदसुखें ही काया ।
लाविसि हरिगुण गाया ॥ ऐ० ॥ ५ ॥

(७) श्रीसाईनाथमहिम्नस्तोत्रम्

सदा सत्स्वरूपं चिदानंदकंदं, जगत्सम्भवस्थानसंहारहेतुम् ।
स्वभक्तेच्छयामानुषं दर्शयंतं,
नमामीश्वरं सद्गुरुसाईनाथम् ॥ १ ॥

भवध्वान्तविध्वंसमार्तण्डमीड्यं,
मनोवागतीतं मुनीध्यानगम्यम् ।
जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां, नमामी० ॥ २ ॥

भवाम्भोधिमग्नादितानां जनानां,
स्वपादाश्रितां स्वभक्तिप्रियाणाम् ।
समुद्धरणार्थ कलौ संभवंतं, नमामी० ॥ ३ ॥

सदा निंबवृक्षस्य
मूलाधिवासात्सुधास्त्राविणं तिक्तमप्यप्रियं तम् ।
तरूं कल्पवृक्षाधिकं साधयंतं, नमामी० ॥ ४ ॥

सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले
भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवाम् ।
नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं, नमामी० ॥ ५ ॥

अनेकाश्रुततर्क्यलीला विलासैः,
समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् ।
अहंभावहीनं प्रसन्नात्मभावं, नमामी ० ॥ ६ ॥

सतां विश्रमाराममेवाभिरामं सदा
सज्जनैः संस्तुतं सन्नमद्भिः ।
जनामोददं भक्तभद्रप्रदं तं, नमामी ० ॥ ७ ॥

अजन्माद्यमेकं परं ब्रह्म
साक्षात्स्व संभवं-राममेवावतीर्णम् ।
भवद्दर्शनात्संपुनीतः प्रभोऽहं, नमामी ० ॥ ८ ॥

श्रीसाईशकृपानिधेऽखिलनृणां सर्वार्थसिद्धप्रद ।
युष्मत्पादरजः प्रभावमतुलं धातापि वक्ताऽक्षमः ।
सद्भक्त्या शरणं कृतांजलिपुतः संप्रापितोऽस्मि प्रभो,
श्रीमत्साईपरेशपादकमलान्नान्यच्छरण्यं मम ॥ ९ ॥

साईरूपधरराघवोत्तमं,
भक्तकामविबुधद्रुमं प्रभुम् ।
माययोपहतचित्तशुद्धये, चिंतयाम्यहमहर्निशं मुदा ॥ १० ॥

शरत्सुधांशुप्रतिमप्रकाश,
कृपातपात्रं तव साईनाथ । त्वदीयपादाब्जसमाश्रितानां
स्वच्छायया तापमपाकरोतु ॥ ११ ॥

उपासनादैवतसाईनाथ, स्तवैर्मयो पासनिना स्तुतस्त्वम् ।
रमेन्मनो मे तव पादयुग्मे,
भृङ्गो, यथाब्जे मकरन्दलुब्धः ॥ १२ ॥

अनेकजन्मार्जितपापसंक्षयो,
भवेद्भवत्पादरोजदर्शनात् । क्षमस्व सर्वानपराध-
पुंजकान्प्रसीद साईश गुरो दयानिधे ॥ १३ ॥

श्री साईनाथचरणांमृतपूतचित्तास्तत्पादसेवनरताः
सततं च भक्त्या । संसारजन्यदुरितौधविनिर्गतास्ते
कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति ॥ १४ ॥

स्तोत्रमेतत्पठेद्भक्त्या यो नरस्तन्मनाः सदा ।
सद्गुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम् ॥ १५ ॥

(८) श्रीगुरूप्रसाद - याचना - दशक

रूसो मम प्रियांबिका, मजवरी पिताही रूसो ।
रूसो मम प्रियांगना, प्रियसुतात्मजाही रूसो ॥
रूसो भगिनी बंधुही, श्वशुर सासुबाई रूसो ।
न दत्तगुरू साई मा, मजवरी कधीही रूसो ॥ १ ॥

पुसो न सुनबाई त्या, मज न भ्रातृजाया पुसो ।
पुसो न प्रिय सोयरे, प्रिय सगे न ज्ञाती पुसो ॥
पुसो सुहृद ना सखा, स्वजन आप्तबंधू पुसो ।
परी न गुरू साई मा मजवरी कधीही रूसो ॥ २ ॥

पुसो न अबला मुले, तरुण वृद्धही ना पुसो ।
पुसो न गुरू धाकुटे, मज न थोर साने पुसो ॥
पुसो नच भलेबुरे, सुजन साधुही ना पुसो ।
परी न गुरू साई मा मजवरी कधीही रूसो ॥ ३ ॥

रूसो चतुर तत्ववित्, विबुध प्राज्ञ ज्ञानी रूसो ।
रूसोहि विदुषी स्त्रिया, कुशल पंडिताही रूसो ॥
रूसो महिपती यती, भजक तापसीही रूसो ।
न दत्तगुरू साई मा, मजवरी कधीही रूसो ॥ ४ ॥

रूसो कवि ऋषी मुनी, अनघ सिद्ध योगी रूसो ।
रूसो हि गृहदेवता, नि कुलग्रामदेवी रूसो ॥
रूसो खल पिशाच्चही, मलिन डाकिनीही रूसो ।
न दत्तगुरू साई मा, मजवरी कधीही रूसो ॥ ५ ॥

रूसो मृग खग कृमी, अखिल जीवजंतु रूसो ।
रूसो विटप प्रस्तरा, अचल आपगाब्धी रूसो ॥
रूसो ख पवनाग्नि वार, अवनि पंचतत्वे रूसो ।
न दत्तगुरू साई मा, मजवरी कधीही रूसो ॥ ६ ॥

रूसो विमल किन्नरा, अमल यक्षिणीही रूसो ।

रूसो शशि खगादिही, गगनिं तारकाही रूसो ॥
रूसो अमरराजही, अदंय धर्मराजा रूसो ।
न दत्तगुरू साइ मा, मजवरी कधीही रूसो ॥ ७ ॥

रूसो मन सरस्वती, चपलचित्त तेंही रूसो ।
रूसो वपु दिशाखिला, कठिण काल तोही रूसो ॥
रूसो सकल विश्वही, मयि तु ब्रह्मगोलं रूसो ।
न दत्तगुरू साइ मा, मजवरी कधीही रूसो ॥ ८ ॥

विमूढ म्हणूनी हसो, मज न मत्सराही डसो ।
पदाभिरूचि उल्हासो, जननकर्दमीं ना फसो ॥
न दुर्ग धृतिचा धसो, अशिवभाव मार्गे खसो ।
प्रपंची मन हें रूसो, दृढ विरक्ति चित्तीं ठसो ॥ ९ ॥

कुणाचीही घृणा नसो, न च स्पृहा कशाची असो ।

सदैव हृदयीं वसो, मनसि ध्यानिं साई वसो ॥
पदीं प्रणय वोरसो, निखिल दृश्य बाबा दिसो ।
न दत्तगुरू साइ मा, उपरि याचनेला रूसो ॥ १० ॥

(९) पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्य
राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति ।
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो
मरुत्तस्यावसन्गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः
सभासद इति ॥

(१०) प्रार्थना

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ।
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्रीप्रभो साईनाथ ॥ १ ॥

श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय
ॐ राजाधिराज योगिराज परब्रह्म
"श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज"

- धूपारतीचा कार्यक्रम समाप्त -

शेजारती
रात्री १० वाजता

(१) आरती

ओवाळूं आरती माझ्या सद्गुरूनाथा, माझ्या साईनाथा ॥
पाचाही तत्वांचा दीप लाविला आतां ॥

निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली ॥
सर्वा घटीं भरूनि उरली साई माउली ॥ ओवाळूं० ॥

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ॥
मायेचिये पोटीं कैसी माया उद्भवली ॥ ओवाळूं० ॥

सप्तसागरीं कैसा खेळ मांडिला ॥
खेळूनिया खेळ अवघा विस्तार केला ॥ ओवाळूं० ॥

ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळां ॥
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ॥ ओवाळूं० ॥

(२) आरती ज्ञानरायाची

आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥

कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें ।
रामजनार्दनीं । पायी मस्तक ठेविलें ॥ ३ ॥

(३) आरती तुकारामाची

आरती तुकारामा । स्वामी सद्गुरूधामा ।
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ ध्रु० ॥

राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिलें ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिलें ॥ १ ॥

तुकता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ २ ॥

(४) शेजारती

(उदो बोला उदो अंबा० या चालीवर)

जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।
आळवितो सप्रेमें तुजला आरति घेऊनि करीं हो ।
जय० ॥ ध्रु० ॥

रंजविसी तू मधुर बोलुनि माय जशी निज मुला हो ।
भोगिसि व्याधी तूंच हरूनियां निजसेवकदुःखला हो ॥
धांवुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ॥
जय० ॥ १ ॥

क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ॥
ओवाळितों पंचप्राण, ज्योति सुमती करीं हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥
जय० ॥ २ ॥

सोडुनि जाया दुःख वाटतें देवा त्वच्चरणांसी हो ॥
आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेउनि निजसदनासी हो ।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो ।
उठवू तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ॥
जय० ॥ ३ ॥

(५) शेजारती

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा साईनाथा ॥
चिन्मय हें सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ ध्रु० ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला ।
बाबा चौक झाडीला ।
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां० ॥ १ ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।
बाबा नवविधा भक्ती ।
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ॥ आतां० ॥ २ ॥

भावार्थाचा मंचक हृदयाकाशीं टांगिला ।
हृदयाकाशीं टांगिला ॥
मनाचीं सुमनें करूनि केलें शेजेला ॥ आतां० ॥ ३ ॥

द्वैतांचे कपाट लावुनि एकत्र केलें ।
बाबा एकत्र केलें ॥
दुर्बुद्धीच्या गांठी सोडूनि पडदे सोडिली ॥ आतां० ॥ ४ ॥

आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला ।
बाबा सांडुनि गलबला ॥

दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ॥ आतां० ॥ ५ ॥

अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुशाला ।
बाबा नाजुक दुशाला ॥
निरंजन सद्गुरू स्वामी निजे शेजेला ॥ आतां० ॥ ६ ॥

प्रसाद मिळण्याकरितां
(६) अभंग

पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिंया ताट ॥ १ ॥
शेष घेउनी जाईन । तुमचें झालिया भोजन ॥ २ ॥
झालों एकसवा । तुम्हा आळवोनीया देवा ॥ ३ ॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलो निवांत ॥ ४ ॥ शेष० ॥

प्रसाद मिळाल्यावर
(७) पद

पावला प्रसाद आतां विठों निजावें,
बाबा आता निजावे ।
आपुला तो श्रम कळों येतसे भावें ॥ १ ॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा,
बाबा साई दयाळा ।
पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ॥ २ ॥

तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या चाडा,
बाबा आपुल्या चाडा ।
शुभाशुभ कर्मदोष हरावया पीडा ॥ ३ ॥

तुका म्हणे दिधलें उच्छिष्टांचे भोजन,
उच्छिष्टांचे भोजन ।
नाहीं निवडिलें आम्हां आपुल्या भिन्न ॥ ४ ॥

- शेजारतीचा कार्यक्रम समाप्त -

प्रत्येक आरतीच्या शेवटी भालदार चोपदार यांच्याकडून खालील बिरूदावली (ललकारी) म्हटली जाते.

ॐ राजाधिराज योगिराज परब्रह्म
"श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज"

श्रीसाईनाथांच्या रथ, पालखी व मिरवणुकीच्या
वेळीं म्हटली जाणारी भजने

(भजनें)

(१) साईनाथ गुरू माझे आई, मजलाठाव द्यावा पायीं ॥
(२) दत्तराज गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायीं ॥
(३) सद्गुरूनाथ साईनाथ, मी अपराधी घ्या पदरांत ॥
(४) मार्गी हळूहळू चाला । मुखानें सांईनाथ बोला
(५) कपाळी केशरी गंध । बाबा तुझा मला छंद ॥
(६) केला स्पर्श समाधीला तर तो साईंचा झाला ।
     बोला जयजयकार बाबाचा ॥
     साईनाथांचा जयजयकार ।
(७) साई माझा ज्ञानेश्वर । महाविष्णूचा अवतार ॥
(८) आकाशात तारका, शिरडींत द्वारका ।
     साईबाबासारखा बाबा, देव नाहीं देव नाहीं ॥

(श्लोक)

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे गुरूस्वरूप तुझे ॥
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणीं ।
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्हीं ॥

॥ साईनाथ गुरू माझे आई ॥
॥ मजला ठाव द्यावा पायी ॥

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥ १ ॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥ २ ॥
नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ॥ ३ ॥
तुका म्हणे गर्भवासीं । सुखे घालावे आम्हांसी ॥ ४ ॥

- समाप्त -

( ४७ )

श्रीरामनवमी - उत्सव
चैत्र शु. ८, ९, व १०

श्री गुरूपौर्णिमा - उत्सव
आषाढ शु. १४, १५, व कृ. १

श्री साईमहाराजांची पुण्यतिथी
विजयादशमी - उत्सव

श्रीपुण्यतिथी - उत्सव
अश्विन शु. नवमी, दशमी व एकादशी
(पारण्याच्या दिवशी एकादशी आल्यास काला द्वादशीस होईल)

दर उत्सवाच्या दिवशी व ३१ डिसेंबर रोजी समाधि-मंदिर हे रात्रभर खुले ठेवण्यात येते व त्यावेळी सर्व कलाकारांची हजेरी समाधीपुढे स्वीकारली जाते.

गलेफाचे माप

३ १/४ मीटर
१ १/४ मीटर
३ मीटर
३/४ मीटर

सर्व साईभक्तांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी गलेफवस्त्र वरील मापांतच पाठविल्यास बाबांच्या समाधीस बरोबर होईल व केलेल्या खर्चाचे समाधान होईल. भक्तांनी समाधीवर घालण्यासाठी आणलेला गलेफ वस्त्र संस्थानच्या कार्यालयात सकाळी नोंद करुन घेणे. गलेफऐवजी त्या मापांची चादर, शाल अगर इतर वस्त्रही चालेल.

श्री साईबाबांची ११ वचने

  1. जो शिर्डीत पाऊल ठेवील, त्याचे दुःख मी दूर करीन ।
  2. माझ्या समाधीची पायरी चढेल, त्याचे सर्व ताप हरतील ।
  3. जरी मी गेलो या देहातून, तरी मी धावून येईन भक्तासाठी ।
  4. माझी समाधी बोलेल तुमच्याशी, माझ्यावर विश्वास ठेवा ।
  5. मी जिवंत आहे हे सदैव जाणा, अनुभव घ्याल तुम्ही स्वतः ।
  6. माझ्या शरण आला रिकाम्या हाताने, तो कधीच परतला नाही ।
  7. जो ज्या भावाने मला भजेल, तसाच अनुभव मी त्याला देईन ।
  8. तुमचा भार मी वाहिन सदैव, हे वचन माझे सत्य जाणा ।
  9. येथे जो जो मदत मागेल, त्याला ती नक्कीच मिळेल ।
  10. माझा भक्त कधीही अधोगतीला जाणार नाही ।
  11. भक्तांच्या मनीचा भाव ओळखून, मी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन ।
॥ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ॥